श्री सत्य नारायण गोयन्का

पार्श्वभूमी

S.N. Goenka
श्री  सत्यनारायण गोयन्काजी आपल्या काळातील सर्वोत्तम विपश्यना (Vipassana) साधना परंपरेमधील गृहस्थ आचार्य आहेत.

जरी भारतीय वंशाचे असले तरी श्री गोयन्काजींचा जन्म आणि मोठेपण म्यानमारमध्येच(ब्रह्मदेश) झाले. तेथे रहात असतानाच सुदैवाने ते सयाजी उ बा खिन यांच्या संपर्कात आले आणि त्यांच्याकडून विपश्यनेचे प्रशिक्षण प्राप्त केले. चौदा वर्षांपर्यंत आपल्या गुरुदेवांकडून प्रशिक्षण प्राप्त केल्यानंतर श्री गोयन्काजी भारतात आले आणि त्यांनी १९६९ पासून विपश्यना शिकविणे चालू केले. जातीयता तसेच सांप्रदायिकतेने विभागलेल्या भारतात श्री गोयन्काजींच्या शिबीरांत समाजाच्या प्रत्येक थरातील हजारो लोकानी आकर्षित होऊन भाग घेतला. त्याशिवाय विश्वभरातील अनेक देशांतील लोक विपश्यना शिबीरात भाग घेऊन लाभान्वित होत आहेत.

सुमारे ४५ वर्षांच्या कालावधीमध्ये  श्री  गोयन्काजी आणि त्यांच्या साहाय्यक आचार्यांनी भारत तसेच पूर्व व पाश्चिमात्य देशांमध्ये शिबीरांद्वारा हजारो-लाखोंना विपश्यना शिकविली. आज, त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापित झालेली ध्यान केंद्रे आशिया, युरोप, अमेरिका, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया इथे कार्यरत आहेत.

आज जी विपश्यना गोयन्काजी शिकवितात ती विद्या जवळजवळ २५०० वर्षांपूर्वी भारतामध्ये भगवान बुध्दांनी पुन्हा शोधून काढली होती. भगवान बुध्दांनी कधीही सांप्रदायिकतेचे शिक्षण दिले नाही. त्यांनी धर्म(धम्म-Dhamma) शिकविला, कि जो मुक्तीचा सार्वजनीन मार्ग आहे. ह्याच परंपरेप्रमाणे श्री गोयन्काजी देखील सांप्रदायिकताविहीन विद्या शिकवितात. यामुळेच ही विद्या विश्वभरातील कोणतीही पार्श्वभूमी असलेल्या लोकांना, जरी तो कोणत्याही संप्रदायाचा असो किंवा संप्रदायावर विश्वास नसलेला असो आकर्षित करते.

श्री. गोयन्काजीना त्यांच्या जीवनकाळात अनेक पुरस्कार मिळाले ज्यात भारताच्या राष्ट्रपतींकडून २०१२ मध्ये प्रतिष्ठेचा पद्म पुरस्कार देखील आहे. भारत सरकारतर्फे दिला जाणारा हा एक Padma Awardsउच्च नागरी पुरस्कार आहे.

सत्यनारायण गोयंकाजीनी सप्टेंबर २०१३ मध्ये आपला अंतीम श्वास घेतला, त्यावेळेस त्यांचे वय ८९ होते. एक अविनाशी वारसा त्यांनी सोडला आहेः विपश्यनेचे तंत्र, जे आता जगभरांतील लोकांसाठी अधिक प्रमाणांत उपलब्ध आहे.


युनो मधील शांति शिखर परिषद

२९ ऑगस्ट २००० मध्ये प्रमुख आचार्य श्री गोयन्काजीना अमेरिकेत न्युयॉर्क येथील संयुक्त राष्ट्र संघाच्या जनरल एसेंब्ली हॉल येथे आयोजिलेल्या “सहस्राब्दि विश्व शांति संमेलन” साठी विश्वभरांतील मान्यवर आध्यात्मिक तसेच धार्मिक नेत्यांबरोबर भाषणासाठी आमंत्रित केले होते.

श्री सत्य नारायण गोयन्काजी यांचे शांति परिषदेला संबोधित भाषण

बिल हिगिन्स ऑगस्ट २९, २०००
S. N. Goenka at U.N.
छायाचित्र Beliefnet,Inc. कडून साभार

न्युयॉर्क---, जिथे पहिल्या प्रथम आध्यात्मिक तसेच धार्मिक नेत्यांचे संमेलन भरले होते तिथे विपश्यना आचार्य गोयन्काजीनी सहस्राब्दि विश्व शांति संमेलनांतील प्रतिनिधिंना राष्ट्र संघाच्या जनरल असेंब्ली हॉलमध्ये संबोधित केले.

धार्मिक समन्वय, सहिष्णुता तसेच शांतिपूर्व सह-अस्तित्व इत्यादि विषयांवर चर्चा चालू असताना आचार्य गोयन्काजीनी कॉन्फ्लिक्ट ट्रांसफॉर्मेशन नामक सत्रामध्ये भाषण दिले.

“लोकांना एका संप्रदायातून दुसऱ्या संप्रदायात रुपांतर करण्याऐवजी”, श्री गोयन्काजी म्हणाले, “हे चांगले होईल की लोकांना दुःखापासून सुखाकडे, बंधनातून मुक्तिकडे, क्रूरतेपासून करुणेकडे वळविण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे.”

जवळजवळ दोन हजार प्रतिनिधी आणि निरिक्षकांच्या समुदायासमोर संमेलनातील दुपारच्या सत्रांत श्री गोयन्काजीनी हे भाषण दिले. हे सत्र सी.एन.एन. चे संस्थापक टेड टर्नर यांच्या भाषणानंतर झाले. श्री टर्नर हे संमेलनाच्या आर्थिक पुरस्कर्त्यापैकी एक होते.

शिखर संमेलनाचा विषय विश्व शांति हा आहे हे ध्यानात ठेवून श्री गोएन्काजीनी ह्या गोष्टीवर जोर दिला की जोपर्यंत व्यक्तिव्यक्तिमध्ये आंतरिक शांति नसेल, तोपर्यंत विश्वामध्ये शांति स्थापन होऊ शकणार नाही. “ विश्वामध्ये शांति प्रस्थापित होऊ शकणार नाही जोपर्यंत लोकांच्या मनांत क्रोध तसेच घृणा आहे. मैत्री आणि करुणेने भरलेल्या हॄदयाद्वारेच विश्वामध्ये शांति स्थापित होऊ शकेल.”

शिखर संमेलनाचा महत्वपूर्ण उद्देश हा आहे की विश्वामध्ये सांप्रदायिक लढाई-भांडण तसेच तणाव कमी करणे. ह्याबद्दल बोलताना श्री गोएन्काजी म्हणाले, “ जोपर्यंत अंतःकरणात क्रोध व द्वेष आहे तोपर्यंत, जरी तो इसाई असो, हिन्दू असो, मुसलमान असो किंवा बौध्द असला तरी सुध्दा दुःखीच असणार.”

तसेच टाळ्यांच्या कडकडाटातच त्यांनी सांगितले, “ ज्यांच्या शुध्द हॄदयांत प्रेम तसेच करुणा आहे तेच आंतरिक स्वर्गीय सुखाचा अनुभव करु शकतात. हाच निसर्गाचा नियम आहे, कुणाला वाटल्यास ईश्वराची इच्छा आहे असे समजावे.”

विश्वांतील प्रमुख धार्मिक नेत्यांच्या ह्या सभेत त्यांनी सांगितले, “ आपण सर्व संप्रदायांच्या समान तत्वावर ध्यान देऊ या, त्यांना महत्व देऊ या. हॄदयाच्या शुध्दतेला महत्व देऊ या, जे सर्व संप्रदायांचे सार आहे. वादविवाद टाळण्यासाठी बाह्य कवचाकडे जसे की सांप्रदायिक कर्मकांड, आचारपध्दती, उत्सव, परंपरा इत्यादिची दखल न घेता आपण धर्माच्या ह्या अंगाला महत्व देऊ.”

आपल्या प्रवचनाचा सारांश सांगताना श्री गोएन्काजीनी सम्राट अशोकाच्या शिलालेखातील वाक्याचा उल्लेख केला ज्यात म्हटले आहे की, “ फक्त आपल्याच धर्माचा सन्मान आणि दुसऱ्यांच्या धर्माची निंदा करु नये. तर पुष्कळशा इतर कारणांमुळे दुसऱ्यांच्या धर्माचा सन्मान करायला हवा. असे केल्याने आपल्या धर्माच्या वाढीस मदत होतेच शिवाय दुसऱ्यांच्या धर्माची सेवा देखील होते. असे न केल्यास आपल्या धर्माची तर कबर खोदली जातेच परंतु दुसऱ्यांच्या धर्माची देखील हानी होते. जो कोणी आपल्या धर्माचा सन्मान करत दुसऱ्यांच्या धर्माची निंदा आपल्या धर्माच्या भक्तीपोटी करत असताना विचार करेल की, “मी माझ्या धर्माचा मी गौरव करेन; परंतु स्वतःच्या अशा वागण्यामुळे तो आपल्याच धर्माचे मोठे नुकसान करतो. ऐक्य हे चांगले आहे. दुसऱ्या धर्मांचा जो उपदेश आहे तो आपण ऐकूया आणि ऐकण्याची उत्सुकता दाखवूया.”

संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव कोफी अन्नान यांनी आशावाद दाखविला की, “ या शिखर परिषदेमध्ये एकत्रित झालेल्या विश्वांतील प्रमुख आध्यात्मिक आणि धार्मिक नेत्यांच्या शांतिच्या एकोप्याने केलेल्या पुकारामुळे नव्या सहस्राब्दिमध्ये शांति वाढेल.”

पहिल्या प्रथमच अशा प्रकारच्या झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या या परिषदेत आध्यात्मिक नेत्याना आमंत्रित केले होते ज्यामध्ये स्वामिनारायण चळवळीतील प्रमुख स्वामी, स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी अग्निवेश, माता अमृतानंदमयी देवी आणि दादा वासवानी खेरीज प्रमुख विद्वान जसे की डॉ. करण सिंग व एल. एम. सिंघवी ह्यांचा समावेश होता.

धार्मिक आणि सांस्कृतिक वैविध्यतेतील भाग घेणाऱ्यांचा संदर्भ देताना अन्नान म्हणाले,” संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजे वेलबुट्टीदार कापड आहे, फक्त साडी व सुटाचे नव्हे तर पाद्री लोकांची गळपट्टी, नन्सचा(जोगीण) पोषाख आणि लामांचा झगा; बिशपचा, डोक्यावरील टोपी, यारमुल्क इत्यादि.”

पुन्हा पुन्हा अन्नानना तिबेटन नेत्यांच्या अनुपस्थितीबद्दल प्रश्न विचारले असता, प्रयत्नपूर्वक प्रश्नाचा रोख परिषदेच्या उद्देशाकडे वळवून ते म्हणाले,” शांतीदूत आणि शांतता प्रस्थापित करणारी ही धर्माची रास्त भूमिका पुनर्स्थापित करण्यासाठी—वादविवादाचा प्रश्न हा बायबल किंवा तोराह किंवा कुराण असा कधीच नव्हता. खरोखर श्रद्धेचा प्रश्न कधीच नव्हता—विश्वास आणि आपण एकमेकाशी कसे वागतो हा होता. विश्वासपूर्ण असा शांती आणि सहिष्णुतेचा मार्ग तुम्ही परत एकदा शिकविला पाहिजे.”

संयुक्त राष्ट्र्संघाच्या नेत्यांनी आशा केली की जर जगांतील ८३%लोकसंख्या वरपांगी धार्मिक किंवा आध्यात्मिक विश्वासाला चिकटून रहात असेल तर ह्या धार्मिक नेत्यांनी आपल्या प्रभावाने अनुयायांना शांतीकडे वळवले पाहिजे.

संयुक्त राष्ट्रसंघ आशा करतो की परिषदेमुळे जागतिक समाज योग्य बाजूकडे वळेल, शब्दांच्या एका दस्तावेजामध्ये सांगायचे म्ह्णजे, ”आध्यात्मिक बळ स्विकारू आणि अत्यंत वाईट अशा मानवी क्रूरतेचे निर्मूलन आपल्या हातांत आहे हे ओळखू-युध्द- तसेच युध्दाच्या मूळ कारणापैकी एक म्हणजे गरीबी. जगांतील आध्यात्मिक नेत्यांनी संयुक्त राष्ट्रासमवेत एकत्रित होऊन मनुष्यजातीच्या अत्यावश्यक गरजा संबोधित करण्याची वेळ आलेली आहे.”

सहभागी नेत्यांनी जागतिक शांततेकरिता जाहीरनाम्यावर सह्या केल्यानंतर तसेच शांतता स्थापनेकरिता आणि शांतता राखण्याकरिता संयुक्त राष्ट्र संघ आणि राष्ट्रसंघाचे महासचिव यांच्यासमवेत कार्य करणारी धार्मिक व आध्यात्मिक नेत्यांची आंतरराष्ट्रीय सल्लागार परिषद स्थापन झाल्यानंतर सदरहू शिखर परिषद येत्या गुरुवारी दि. ३१ ऑगस्ट रोजी समाप्त होईल.

“धार्मिक व आध्यात्मिक नेत्यांच्या आंतरराष्ट्रीय सल्लागार परिषदेचे ध्येय, संयुक्त राष्ट्र संघाच्या कार्याचे विस्तारिकरण आणि मजबूतीकरण हे आहे”, असे जागतिक शांतता शिखर परिषदेचे महासचिव श्री. बावा जैन यांनी सांगितले. “विवादाप्रसंगी, जगातील थोर आध्यात्मिक आणि धार्मिक नेत्यांना अशा ज्वलंत मुद्द्यांवर अहिंसात्मक तोडगा काढण्यासाठी एका पीठावर आणता येईल, अशी आमची प्रामाणिक आशा आहे.”संयुक्त राष्ट्र संघातील प्रवचन

सहस्राब्दि जागतिक शांतता शिखर परिषदेमध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या सभागृहात मंगळवार दि. २९ ऑगस्ट २००० रोजी श्री. स. ना. गोयन्काजींनी दिलेले संपूर्ण प्रवचन खालीलप्रमाणे आहे.

श्री स. ना. गोयन्काजी द्वारा ‘विश्वशांतीसाठी सार्वभौम आध्यात्मिकता’

तारिखः ऑगस्ट २९, २०००

जिथे अंधार असतो, तिथे प्रकाश आवश्यक असतो. आज हिंसेने निर्माण केलेले वादविवाद, युद्ध आणि रक्तपातामुळे सर्वत्र दुःखदायक स्थिती असताना जगाला आत्यंतिक आवश्यकता आहे, ती ऐक्याची आणि शांततेची. धार्मिक आणि आध्यात्मिक नेत्यांसाठी हे फार मोठे आव्हान आहे. हे आव्हान आपण स्वीकारूया.

प्रत्येक धर्माचे एक बाह्य आवरण असते आणि एक अंतरंग, एक मध्य असतो. बाह्यावरणामध्ये विधी, आचारपद्धती, संस्कार, मत, रूपक आणि सिद्धांत असतात. हे धर्मागणिक बदलते असतात. परंतु सर्व धर्मांचे अंतरंग मात्र समान असते ; ते म्हणजे सदाचार आणि उदारता शिकवणारे, तसेच सहिष्णुता, सौहार्दता, दया आणि प्रेम यांनी परिपूर्ण असणाऱ्या शुद्ध आणि शिस्तपूर्ण मनाची शिकवण देणारे सार्वभौम असे ज्ञान. ह्या समान सूत्रावर प्रत्येक धार्मिक नेत्याने भर दिला पाहिजे आणि धर्माभिमान्यांनी आचरणात आणले पाहिजे. सर्व धर्मांच्या ह्या अंतरंगाला जर योग्य महत्त्व दिले गेले आणि बाह्य भावांप्रती अधिक सहिष्णुता दाखवली गेली, तर विवाद कमी होतील.

सर्व व्यक्तींना आपल्या श्रद्धेचे अनुगमन करण्याचे आणि तदनुषंगिक आचरणाचे स्वातंत्र्य असावे. मात्र असे करताना त्यांनी त्यांच्या धर्माच्या अंतरंगाकडे, अंतरतत्वाकडे त्यांचे दुर्लक्ष होऊ नये तसेच त्यांच्या धार्मिक आचरणामुळे इतरांचा शांतीभंग होऊ नये, त्यांच्या धर्मश्रद्धांना कमी लेखू नये अथवा त्यांची निंदा करू नये, ही काळजी घ्यावी.

धर्मश्रद्धांमधले वैविध्य लक्षात घेता, आपल्याला मतभेदांवर मात कशी करता येईल आणि शांततेसाठी परिपूर्ण योजना कशी साकारता येईल? निरनिराळी मते असणारे अनेक जण ज्ञान प्राप्त झालेल्या अशा गौतम बुद्धाकडे जात असत. त्यांना तो सांगत असे, “आपण आपले मतभेद बाजूला ठेवूया. आपले एकमत ज्याच्यावर होऊ शकेल, अशा बाबींकडेच आपण लक्ष देऊया आणि तेच आचरणात आणूया, भांडायचे कशासाठी?” तो शहाणा सल्ला आजही तितकाच मौल्यवान आहे.

मी अशा भूमीतून आलो आहे, जिने गेल्या काही सहस्राब्धींमध्ये अनेक तत्वज्ञान आणि आध्यात्मिक मत-शाखांना जन्म दिला आहे. हिंसेच्या काही तुरळक स्वतंत्र घटना वगळता, शांततापूर्ण सहजीवनाचा नमुना म्हणून माझ्या देशाकडे पाहिले जाते. सुमारे २३०० वर्षांपूर्वी ज्यावर सम्राट अशोकाने राज्य केले होते, तेव्हाचे राज्य आजच्या अफगाणिस्तानापासून ते बांगलादेशापर्यंत पसरलेले होते. ह्या दयाळू राजाने त्याच्या संपूर्ण राज्यकारकिर्दीत दगडी आज्ञापत्रे खोदून घेतली, ज्यामध्ये सर्व धर्मश्रद्धांचा आदर करण्याबाबतचे आदेश होते, परिणामतः सर्व आध्यात्मिक परंपरेतल्या अनुयायांना त्याच्या छत्राखाली सुरक्षित वाटत असे. तो आपल्या प्रजाजनांना नीतीपूर्ण आयुष्य जगण्यास, आपल्या माता-पित्यांच्या व वडीलधाऱ्यांचा मान ठेवण्यास तसेच हिंसेपासून परावृत्त होण्यास सांगत असे. आपल्या प्रजाजनांना प्रवृत्त करणारे त्याचे ते शब्द आजही समर्पक आहेत.

फक्त स्वतःच्या धर्माला मान देऊन इतर धर्मांची निंदा करू नये. त्यापेक्षा, प्रत्येकाने विविध कारणांसाठी दुसऱ्या धर्मांचाही मान ठेवावा. असे करण्याने तो आपलाच धर्म वाढण्यास मदत करत असतो आणि इतरांच्या धर्माचीही सेवा करत असतो. ह्याउलट विरूध्द आचरणातून तो आपल्या धर्मासाठी थडगे तर खणतोच, पण इतरांच्या धर्माचीही हानी करतो. स्वतःच्या धर्माचा आदर ठेवणे आणि दुसऱ्याच्या धर्माची निंदा करणे, हे एखादा कदाचित स्वतःच्या धर्मनिष्ठेखातर ‘माझ्या धर्माचा मी गौरव करेन’ अशा विचाराने करतही असेल, परंतु त्याचे हे कृत्य त्याच्याच धर्माची अधिक हानी करेल. आपापसातील एकता अधिक चांगली. आपण सर्व इतर धार्मिक सिद्धांत ऐकूया आणि ऐकण्याची इच्छाही ठेवूया. (कोरीव पाषाण १२).

सम्राट अशोक, हा सहिष्णूता, सहवर्तन आणि शांतीपूर्ण संयोगीकरणाच्या गौरवपूर्ण परंपरेचे प्रतिनिधीत्व करतो. ही परंपरा आजच्या शासन आणि राज्यकर्त्यांमध्ये जागृत आहे. याचे उदाहरण म्हणजे ओमानचे थोर राजे, ज्यांनी स्वतःच्या धर्माचे निष्ठापूर्वक आणि एकाग्र पालन करताना इतर धर्मश्रद्धांच्या चर्च आणि मंदिरांसाठी जमीन उपलब्ध करून दिली. मला खात्री आहे की, असे दयाळू राजे आणि शासनकर्ते पुढील काळात जगभरातील अनेक देशांमध्ये निर्माण होत राहतील. म्हटले आहेच, “शांतीनिर्माते धन्य आहेत, कारण ते ईश्वराची संतान म्हणून ओळखले जातील”.

हे अतिस्पष्ट आहे, की हिंसेचे उपासक प्रथम स्वतःचे आप्त आणि नातेवाईक यांची हानी करतात. त्यांच्या असहिष्णुपणातून ते असे प्रत्यक्ष तरी करतील, किंवा मग त्यांच्या कृतीला हिंसात्मक प्रतिसाद मिळण्याकरिता चिथावून अप्रत्यक्षरित्या तरी करतील. उलटपक्षी असे म्हटले आहे की, “धन्य ते क्षमावंत, कारण त्यांनाच क्षमा मिळेल”. हा निसर्गनियम आहे. दुसऱ्या शब्दांत यालाच ईश्वराचा निर्णय किंवा मार्ग असेही म्हणता येईल. गौतम बुद्धाने म्हटले आहे, “वैर हे वैराने संपणार नाही, तर फक्त त्याच्याविरुद्ध केलेल्या कृतीनेच संपेल. हा शाश्वत धर्म आहे. [आध्यात्मिक नियम].” भारतात ज्याला धर्म असे संबोधले जाते, त्याचा हिंदुत्व, बुद्धीझम, जैनीझम, ख्रिस्तीझम, इस्लाम, ज्युडाझम, शीखिझम किंबहुना अशा इतर कोणत्याही “इझम”शी संबंध नाही. हे सरळ साधे सत्य आहे कीः इतरांची हानी करण्याआधी नकारात्मक मानसिक विचारांच्या निर्मितीमुळे तुमची स्वतःची हानी प्रथम होते, आणि ही नकारात्मकता काढून टाकली, तर तुम्हाला स्वतःमध्येच शांतता मिळेल आणि विश्वशांती अधिक दृढ होईल.

जागतिक शांततेसाठी मनःशांती

धर्म म्हणवण्यालायक प्रत्येक धर्म त्याच्या अनुयायांना भावनिक शुद्धतेचा अभ्यास करण्यासाठी व मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि हृदयाची शुद्धता व नैतिक जीवन जगण्याविषयी उपदेश देतो. एक परंपरा असे सांगते, "Love thy neighbor"; “शेजाऱ्यावर प्रेम करा”, दुसरी सांगते, सलाम वालेकुम –‘तुझ्याबरोबर शांती राहोत’, आणखी एक सांगते, “भवतु सब्ब मंगलम्” किंवा “सर्वे भवन्तु सुखिनः” –“सर्वजण सुखी, आनंदी राहोत”. बायबल असो, कुराण असो अथवा गीता असो, सर्व धर्मग्रंथ शांती आणि बंधुत्वाचाच उपदेश करतात. भगवान् महावीरांपासून येशू ख्रिस्तापर्यंत सर्व थोर धर्मसंस्थापक सहिष्णुता आणि शांतता यांचे आदर्श होते. तरीही आपले जग धार्मिक आणि सांप्रदायिक संघर्षाप्रमाणे प्रेरित होते, किंवा युद्धाप्रमाणेही- कारण आपण धर्माच्या केवळ बाह्य आवरणाला महत्त्व दिलेले असते, आणि त्याच्या अंतरंगाकडे दुर्लक्ष केलेले असते. हा परिणाम प्रेमाच्या आणि दयेच्या मनातल्या अभावामुळे झालेला असतो.

प्रत्येक व्यक्तीमध्ये शांती निर्माण झाल्याशिवाय विश्वात शांती प्रस्थापित होऊ शकणार नाही. प्रक्षोभ आणि शांती एकत्र नांदू शकत नाहीत. अंतर्गत शांती प्राप्त करण्याचा एक मार्ग म्हणजे विपश्यना किंवा सूक्ष्म दृष्टीने ध्यान – एक असांप्रदायिक, वैज्ञानिक, परिणाम-केंद्रित तंत्रज्ञान अशी स्व-निरीक्षणाची आणि सत्यानुभूतीची साधनापद्धती. ह्या साधनापद्धतीच्या अभ्यासाने मन आणि शरीर यांच्या परस्पर-क्रियांचे ज्ञान प्रत्यक्ष अनुभूतीतून मिळते. प्रत्येक वेळी मनामध्ये जेव्हा द्वेषासारखी नकारात्मक मानसिकता उदभवते, तेव्हा ती शरीरावर दुःखदायक संवेदनांना चालना देते. प्रत्येक वेळी मनामध्ये जेव्हा निरपेक्ष प्रेमाचा, दयेचा आणि सौहार्दाचा उदय होतो, तेव्हा संपूर्ण शरीरामध्ये जणू आनंददायी संवेदनांचा पूर लोटतो. विपश्यनेच्या अभ्यासातून हे सुद्धा समजते, की प्रत्येक शारीरिक आणि वाचिक कृतीआधी मानसिक कृती उमटते, जी ती प्रत्यक्ष कृती हितकारक असेल की अहितकारक असेल, ते ठरवते. मन अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणूनच आपण मनाला शुद्ध आणि शांत करणाऱ्या यथार्थ आणि अनुभविक पद्धतींचा शोध घेणे आवश्यक आहे. जागतिक शांतता शिखर परिषदेतून तयार होणाऱ्या सामुहिक जाहीरनाम्याची परिणामकारकता अशा साधनापद्धतींमुळे आणखी वृध्दिंगत होईल.

प्राचीन भारताने दोन प्रकारच्या आचरण पध्दती विश्वाला दिल्या. एक म्हणजे योग आसनाचा शारिरिक व्यायाम आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी श्वासावर ताबा (प्राणायाम). दुसरा म्हणजे मन निरोगी ठेवण्यासाठी विपश्यनेतून मनाचा व्यायाम. कोणत्याही प्रकारच्या धर्मश्रध्दा असलेले लोक ह्या दोन्ही प्रकारच्या पध्दती आचरणात आणू शकतात. त्याचवेळी ते स्वतःचा धर्म शांततेने आणि एकतेने पाळू शकतात; धर्मांतर ज्याचे मूळ कारण तणाव आणि झगडा आहे ते करण्याची आवश्यकता नाही

समाज जर स्वस्थ रहायचा असेल तर समाजांतील जास्तीत जास्त लोक शांत असायला हवेत. नेते म्हणून आदर्श असणे व प्रेरणा देणे ही आपली जबाबदारी आहे. एकदा ज्ञानी पुरुष म्हणाले,” दुसऱ्यांचे अथिर मन स्थिर करण्यासाठी स्थिर मनाचीच आवश्यकता असते.”

सारांशाने, शांतिप्रिय समाज आपल्या नैसर्गिक स्थितित शांततेत राहाण्याचा मार्ग शोधेल. वातावरण सुरक्षित ठेवण्यासाठी, ते मलीन होणे थांबवण्याची गरज आहे हे आपल्याला समजते. पण ते करण्यापासून आपल्याला अडवतात ते आपले मानसिक दोष, जसे की अज्ञान, निष्ठूरता किंवा लोभीपण हे आहे. असे मालिन्य काढून टाकल्यास मानवांमध्ये शांतीला प्रोत्साहन मिळेल, तसेच समाज आणि नैसर्गिक वातावरण ह्यामधील समतोल व निरोगी संबंध राखण्यासाठी साहाय्यकारी होईल. अशा प्रकारे धर्म वातावरणाचे संरक्षण करण्यास उत्तेजन देऊ शकेल.

अहिंसाः धर्माच्या परिभाषेची किल्ली

दोन धर्मांमध्ये फरक असणे साहजिक आहे. काही झाले तरी ह्या जागतिक शांतता परिषदेंत जमलेल्या विविध विचार धारेच्या नेत्यांनी जागतिक शांततेसाठी काम करण्याचे दर्शविले आहे. प्रथम शांतता, नंतर पहिले मूलतत्व “ जागतिक धर्म ”चे. आपण सर्वजण जाहीर करूया की आम्ही ह्त्या करण्यापासून दूर राहू, आम्ही हिंसेची निंदा करतो. युध्द किंवा शांतता यांत मुख्य भूमिका बजावणाऱ्या राजकिय नेत्यानी देखील ह्या जाहीरनाम्यात सामील व्हावे ह्यासाठी मी आग्रह करेन. ते यामध्ये सामील होवोत वा न होवोत, कमीतकमी येथे आणि आता तरी आपण स्विकारु याः हिंसा आणि हत्येला क्षमा करण्याऐवजी, विषेशतः धर्माच्या नावाखाली जेव्हा हिंसेचे दुष्ट कर्म होते तेव्हा आम्ही अशा कृत्याची विनाअट निंदा करतो असे जाहीर करुया.

काही आध्यात्मिक नेत्यांना आपल्या स्वतःच्या धार्मिकश्रध्देच्या नावाखाली केलेल्या हिंसेला दोष देण्याचे द्रष्टेपण आणि धैर्य असतेच असते. केली गेलेली हिंसा आणि त्या हत्येला क्षमा मिळवण्याचे वा पश्चात्ताप करण्याचे तत्वज्ञान आणि ब्रम्हज्ञान अवलोकनाचे दॄष्टिकोन वेगळे असू शकतात; परंतु पूर्वी केलेल्या हिंसेची कबुली सूचविते की ते कृत्य चुकीचे होते आणि भविष्यांत अशांना क्षमा केली जाणार नाही.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या छत्राखाली आपण धर्म आणि अध्यात्माची अहिंसेला अधोरेखीत करणारी व्याख्या सुत्ररुपाने तयार करण्याचा प्रयत्न करु या, आणि हिंसा व हत्येला उत्तेजन देण्याचे नाकारुया. शांतता हाच धर्माला प्रतिशब्द असल्याची व्याख्या न केल्यास मानवजातीस या पेक्षा मोठे अपयश असणार नाही. ही शिखर परिषद “जागतिक धर्म” किंवा ”पंथरहित आध्यात्मिकता” या कल्पनेला संयुक्त राष्ट्रसंघाच्या पसंतीसाठी पुढे करु या.

धर्माच्या खऱ्या उद्देशावर जगाचे लक्ष केन्द्रीत करण्यासाठी ही शिखर परिषद मदत करेल याची मला खात्री आहे.

धर्म आपल्याला एकत्र आणतो
विभक्त करीत नाही; तो आपल्याला शांती आणि अंतःकरणाची शुध्दता शिकवितो.

या ऐतिहासिक शिखर परिषदेचे आयोजन करणाऱ्यांचे त्यांच्या दुरददृष्टी व प्रयत्नांबाद्दल मी अभिनंदन करतो. मी धार्मिक व आध्यात्मिक नेत्यांचे अभिनन्दन करतो ज्यांची परिपक्वता एकवाक्यतेसाठी काम करण्याची, तसेच अशी आशा दाखविताना की ज्यामुळे धर्म आणि आध्यात्मिकता मानवजातीला शांततापूर्वक भविष्याकडे नेईल.

सर्वजण द्वेषापासून मुक्त होवोत आणि सुखी होवोत.

ऐक्य आणि शांती नांदो.